संत जनार्दन स्वामी
संत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्दन स्वामी यांच्या पादुका दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर आहेत.
औरगाबाद - जनार्दन स्वामी यांचा इतिहास सुमारे 400 वर्षांपूर्वीचा म्हणजे इसवी सन 1450 ते 1560 या कालखंडातील आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार संत जनार्दन स्वामी हे पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे गुरू. ते मूळचे चाळीसगावचे देशपांडे होते. निझामशाहीच्या काळात देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. किल्ल्याच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी ते सांभाळायचे. जनार्दन स्वामी यांची श्री गुरुदत्तावर प्रचंड श्रद्धा होती. किल्ल्यावरील एका भुयारासारख्या छोट्याशा जागेत ते तासन्तास समाधिस्थ होत असत. येथेच त्यांना श्री गुरू दत्तात्रेयाचा अनेक वेळा साक्षात्कार होत असल्याचेही भक्तगण सांगतात. जनार्दन स्वामींनी येथेच ‘आत्मानाम विवेकसार’ हा ग्रंथ लिहिला. दत्तो वामन पोतदारांनी याची एक प्रत पैठणला बघितल्याचे इतिहास सांगतो.
एकनाथ महाराजांचे 6 वर्षे वास्तव्य
संत जनार्दन स्वामी येथे ध्यानस्थ बसायचे. यामुळे त्यांच्या पादुका येथेच काढलेल्या असायच्या. त्यांच्या शेजारीच श्री दत्तगुरूंच्या पादुका असल्याचेही भाविक सांगतात. एकनाथ महाराजही येथे सहा वर्षे राहिल्याची आख्यायिका आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरखंडी कासार येथे जनार्दन स्वामींनी समाधी घेतली. स्वामीजी येथून गेले, पण त्यांच्या पादुका येथेच राहिल्या. आजही वारकरी समाजातील हजारो भाविक देवगिरीच्या किल्ल्यावर दर्शनासाठी येतात. मार्गशीर्ष वद्य एकादशीस येथे मुख्य यात्रा भरते.
No comments:
Post a Comment